अहमदनगर

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याला पोलिसांकडून अमानुष वागणूक; व्हिडिओ व्हायरल, दूतावासाने घेतली दखल


न्यूयॉर्क

अमेरिकेतील नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याशी अत्यंत अमानवीय वागणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चार पोलिस अधिकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्याला जमिनीवर पाडून त्याच्या हातपायांना बेड्या घातलेल्या दिसत आहेत. दोन अधिकाऱ्यांनी तर गुडघे त्याच्या पाठीवर ठेवले आहेत. या वेळी तो विद्यार्थी रडत असल्याचेही व्हिडीओमध्ये दिसून येते.

हा व्हिडीओ प्रत्यक्षदर्शी आणि भारतीय-अमेरिकन उद्योजक कुणाल जैन यांनी शूट केला असून त्यांनी सांगितले की, पोलिस अधिकारी विद्यार्थ्याशी गुन्हेगारासारखे वागत होते. विद्यार्थ्याने हरियाणवी भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस म्हणाले की त्यांना हिंदी समजत नाही. जैन यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली.

या प्रकारानंतर भारतीय दूतावासाने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देत सांगितले की, "नेवार्क विमानतळावर एका भारतीय नागरिकाला अडचणी येत असल्याची माहिती आम्हाला सोशल मीडियावरून मिळाली असून आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत."

दूतावासाने आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले की, "भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी आम्ही सदैव वचनबद्ध आहोत."

कुणाल जैन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "या विद्यार्थ्याच्या पालकांना याची कल्पना नसेल की त्यांच्या मुलासोबत काय होत आहे. तो माझ्यासोबतच विमान प्रवासासाठी येणार होता, पण त्याला बोर्डिंग करता आले नाही. तो खूप गोंधळलेला आणि भयभीत दिसत होता. कोणी तरी शोधून काढले पाहिजे की त्या मुलाबरोबर काय घडले." त्यांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासासह परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनाही टॅग केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या