बोधेगाव प्रतिनिधी मोहटे (ता. पाथर्डी)
श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, श्री मोहटादेवी देवस्थानच्या नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या दहा विश्वस्तांची प्रथम मार्गदर्शन बैठक मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. अंजू शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. देवस्थानचा सर्वांगीण विकास, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि मंदिर परिसराची उभारणी याबाबत या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
मा. न्यायाधीश शेंडे यांनी देवस्थानच्या परंपरा आणि ऐतिहासिक महत्त्वाला साजेशा सुविधा उभारण्यावर भर देत विकास आराखड्याची दिशा स्पष्ट केली. भाविकांना सुरक्षित, शिस्तबद्ध व सुलभ दर्शन व्यवस्था निर्माण करणे, धार्मिक सेवांचा विस्तार करणे आणि देवस्थानची राज्यभर तसेच देशभर प्रसिद्धी वाढवणे यावर त्यांनी विशेष भर दिला.
बैठकीत सर्वानुमते मंजूर ठरावांमध्ये पुढील प्रमुख निर्णयांचा समावेश करण्यात आला :
- भाविक व ग्रामस्थांसाठी मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी देवस्थानतर्फे रुग्णालय उभारण्यासाठी प्राथमिक नियोजन.
- बाह्यरुग्णसेवा (OPD) तातडीने सुरू करण्याचा निर्णय.
- देवस्थानची व्यापक प्रसिद्धी वाढविण्यासाठी विविध माध्यमांतून माहितीपर संपर्क मोहीम.
- भाविकांच्या मागणीवरून उत्सवमूर्तीवरील अभिषेक सेवा पुनः सुरू करणे.
- विविध धार्मिक पूजा–व्यवस्था सुरु करून भाविकांना अधिक सेवा उपलब्ध करून देणे.
- मोहटे ग्रामस्थांच्या सहभागातून वार्षिक उत्सव भव्य स्वरूपात आयोजित करण्याची तयारी.
- देवीच्या सुलभ दर्शनासाठी आधुनिक आणि शिस्तबद्ध व्यवस्था उभारण्याची कार्ययोजना.
- शासनाच्या समन्वयाने मंदिर परिसराचा विकास आणि आवश्यक सुविधा निर्माण करणे.
- देवस्थानच्या उन्नतीसाठी दीर्घकालीन संकल्पित कार्ययोजनांची अंमलबजावणी सुरू करणे.
नवनियुक्त विश्वस्तांनी पदसिद्ध विश्वस्त तसेच न्यासाचे चेअरमन व जिल्हा न्यायाधीश महेश लोणे यांच्या नेतृत्वाखाली देवस्थान विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. आगामी काळात भाविकांच्या सहकार्याने मंदिराला धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधिक उंचीवर नेण्याचा संकल्प विश्वस्तांनी व्यक्त केला.
या बैठकीस विश्वस्त बाबासाहेब दहिफळे, शशिकांत दहिफळे, शुभम दहिफळे, अशोक दहिफळे, राजेंद्र शिंदे, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. कल्याण बडे, ॲड. प्रसन्न दराडे, श्रीकांत लाहोटी, श्रीमती ऋतिका कराळे उपस्थित होते.
प्रास्ताविक शुभम दहिफळे यांनी केले. सूत्रसंचलन ॲड. विक्रम वाडेकर यांनी तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी मानले.

0 टिप्पण्या