फलटण 

महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात विदीप जाधव यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. विदीप जाधव यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.

फलटण जवळील तरडगाव येथील जाधव यांच्या निवासस्थानी पोहोचून सुनेत्रा पवार यांनी शोक व्यक्त केला. विदीप जाधव यांच्या पत्नीचा हात हातात धरून त्यांनी या कठीण प्रसंगात संपूर्ण कुटुंबियांना धीर दिला. ३१ जानेवारी रोजी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी या कुटुंबाची भेट घेत आपली संवेदनशीलता जपली. जाधव यांच्या मुलांच्या डोक्यावर मायेचा हात ठेवत "मी प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे," असा विश्वास त्यांनी दिला. या भावूक भेटीमुळे उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते.