छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे शाखेने (क्राइम ब्रांच) एक अत्यंत मोठी कारवाई करत १९९० च्या दशकातील कुप्रसिद्ध डॉन बाबा फरजान याच्या घरावर छापा टाकला आहे. १० जुलै रोजी रात्री मिटमिटा परिसरात झालेल्या या कारवाईत तब्बल ५ कोटी ६३ लाख ३७ हजार ९९४ रुपयांचा बेहिशोबी ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ५ कोटी २६ लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. जप्त केलेल्या हत्यारांमध्ये एक मशीन गन, चार रायफल, दोन पिस्तूल, दोन एअरगन आणि ६ हजार ३५० जिवंत काडतुसे तसेच १७ प्रकारचे चाकू आणि तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. बाबा फरजानचे गेल्या महिन्यात मधुमेहामुळे निधन झाले असून, कारवाई दरम्यान त्याची दुसरी पत्नी शीला साळवे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी नोटा मोजण्यासाठी पाच मशिन्सचा वापर केला असून या प्रकरणात छावणी पोलीस आणि गुन्हे शाखा पुढील तपास करत आहेत, तसेच जप्त केलेल्या बेहिशोबी मालमत्तेची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे.