छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (लाप्रवि) सोमवारी मोठी कारवाई करत ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन याला रंगेहाथ अटक केली. याच प्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांचाही सहभाग असल्याची प्राथमिक माहिती असून त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी मौजे तिसगाव, छ. संभाजीनगर येथील गट क्रमांक 225/5 मधील ६ एकर १६ गुंठे वर्ग २ ची जमीन शासनाच्या परवानगीने सर्व नियमानुसार सन २०२३ मध्ये विकत घेतली होती. सदर जमीन वर्ग २ वरून वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारे चलन जनरेट करून देण्यासाठी आरोपींनी १८ लाख रुपयांची लाच मागितली होती.
दि. २६ मे रोजी पडताळणी दरम्यान महसूल सहाय्यक त्रिभुवन यांनी सांगितले की, आरडीसी साहेबांनी (निवासी उपजिल्हाधिकारी) १८ लाख रुपये ठरवले आहेत. यानुसार तडजोड करून ५ लाख रुपयांची पहिली रक्कम घेऊन उर्वरित १३ लाख रुपये नंतर देण्याचे ठरले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि. २७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सापळा रचून दीपक त्रिभुवन याला ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर दुसरी टीम त्वरित निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या केबिनमध्ये झडती दरम्यान ७५ हजार रुपये रोख रक्कम आढळून आली, तर त्यांच्याकडे आयफोन १५ प्रो मॅक्स होता. त्रिभुवन याच्याकडे सॅमसंग मोबाईल व ३००० रुपये सापडले.
या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात लाच प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७, ७ अ, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा कारवाईत सहभागी अधिकारी:
- सापळा अधिकारी: शांतीलाल चव्हाण, पोलीस निरीक्षक
- सहाय्यक अधिकारी: गोरखनाथ गांगुर्डे, पो.उप.अधीक्षक
- मार्गदर्शन: संदीप आटोळे (पोलीस अधीक्षक), मुकुंद अघाव (अप. पो. अधीक्षक), सुरेश नाईकनवरे (पो.उप.अधीक्षक)
सार्वजनिक आवाहन:
छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांनी कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याने अथवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागितल्यास लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
तक्रारसाठी संपर्क:
टोल फ्री क्रमांक: 1064
पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, छ. संभाजीनगर: 0240-2344050

0 टिप्पण्या