अहमदनगर

सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्गासाठी २३४ कोटी निधी मंजूर

कायगांव टोका नेवरगाव ते धोत्रे नवीन मार्ग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगर येथे घोषणा; सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांच्या प्रयत्नांना यश


गंगापूर प्रतिनिधी

गोदावरीकाठी असलेल्या २०० तीर्थस्थानाना जोडणाऱ्या ‘सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्गा'साठी २३४ कोटी निधी मंजूर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामदीनी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात केली. नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते हरिहर पांडे यांनी जानेवारी २०२२ पासून मागणी करत होते.  

१२ व्या शतकातील तीर्थस्थानांना जोडण्यासाठी हा मार्ग प्रत्यक्षात साकारण्याच्या हालचालींना वेग आला. हरिहर पांडे यांच्या संकल्पनेतील या मार्गासाठी २३४ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी शासनाला सादर केले होते.

'सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्गा'साठी महाराष्ट्र शासनाकडून २३४ कोटी रकमेला मंजुरी मिळावी. हरिहर पांडे यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट भेट घेतली होती. विशेष म्हणजे भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाच्या दिवशी महाराष्ट्र सदन, दिल्ली येथील कार्यक्रमात 'सर्वज्ञ अष्ट शताब्दी मार्गा'चा ठराव पारित करण्यात आला होता.

महानुभाव पंथ प्रवर्तक परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने १२ व्या शतकात संपूर्ण महाराष्ट्र पुनित झाला, स्वामींच्या पदस्पर्शाने महाराष्ट्रात १६५० तीर्थस्थाने निर्माण झालेली आहेत. त्यातील सुमारे २०० तीर्थस्थाने गोदावरीकाठी सावखेडगंगा ते जामगांवपर्यन्त आहेत. समृद्धी महामार्ग वैजापूर जवळील सावखेडगंगा- हमरापूर- कानडगांव- जामगांव - राष्ट्रीय महामार्ग कायगाव पर्यन्त ५२ किमी २३४ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक साबांविभागाने तयार केले होते. कोट्यावधी महानुभावांच्या भावना जुळल्या असलेल्या 'सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्गा'साठी महाराष्ट्र शासनाने 'विशेष बाब' म्हणून रू २३४ कोटी रकमेला तात्काळ प्रशासकीय मंजुरी द्यावी, तसेच मुख्य सचिव समितीकडे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले होते. या मार्गासाठी अनेक वर्षांपासून हरिहर पांडे यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.


छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील गोदावरीकाठी श्रीक्षेत्र डोमेग्राम (कमालपूर) येथे महानुभाव पंथाची पायाभरणी झाली.१२ व्या शतकात सर्वज्ञाच्या पदस्पर्शाने श्रीक्षेत्र हिंगोणी, पूरणगांव, पूणतांवा, नायगांव, नाऊर, सावखेडगंगा, वांजरगाव, चांदेगाव, नागमठाण, हमरापूर, बाजाठाण, देवगांव, नेवरगांव, सुरेगाव, कानडगांव, ममदापूर, बगडी, जामगांव, गंगापूर ही स्थाने पवित्र झालीत. या तीर्थस्थानांचे संवर्धन आणि भाविकांना ये-जा सोयीचे होण्यासाठी 'सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग' चांगला पर्याय ठरेल, हा विश्वास कोट्यवधी महानुभावांना आहे.

-हरिहर पांडे, सामाजिक कार्यकर्ते, नागपूर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या