शेंदुरवादा प्रतिनिधी
बांधकामे न करताच कंत्राटदारांने बोगस बिले दिल्याचा प्रकार गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा भागात मागील महिन्यात घडला होता. याबाबत १६ एप्रिल २०२५ रोजी 'सकाळ'ने 'कागदावरच केले रस्त्याचे काम' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. आमदार आणि अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या ठेकेदाराकडून आता गुरु धानोरा येथील आरोग्य केंद्राचे बांधकाम उरकण्याचा धडाका सुरू असताना सदरील काम हे अंदाज पत्रकारानुसार होत नसल्यामुळे गुरु धानोरा येथील पदाधिकारी व ग्रामस्थांनी रविवारी (ता.एक) कामाच्या गुणवत्तेबाबत विचारणा करत सदरील काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत ते काम बंद पाडण्याचा प्रकार घडला आहे.
ग्रामस्थांच्या अनेक दिवसापासून असलेल्या मागणीला प्रतिसाद देत धामोरी ते टेंभापुरी, राज्य मार्ग ३९ ते सिरसगाव, मांडवा ते पांढरओव्हळ, महालक्ष्मीखेडा ते तळपिंप्री या रस्त्यांची तसेच गुरुधानोरा आरोग्य उपकेंद्र पांढरओव्हळ येथील शाळा दुरुस्ती या कामाला मंजूर देण्यात आली होती. मात्र वैजापूरच्या बांधकाम उपविभागातील अधिकारी. आणि ठेकेदाराने संगणमत करून कामे न करताच बिले काढण्याचा प्रताप केला होता. याबाबत आमदार प्रशांत बंब यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला घेऊन सदरील कामाची पाहणी केली होती. मात्र दीड महिना होऊनही सदरील कामाची चौकशी फक्त प्रशांत बंब यांनी केलेल्या पाहणीवरच थांबल्याने याबाबत तर्क वित्तर्क लावले जात असून गुरु धानोरा येथील ठेकेदाराने सदरील काम अंदाजपत्रकाप्रमाणे न करता जसे जमेल तसे उरकण्याचा धडाका सुरू केला केल्याने गुरु धानोरा येथील संतप्त ग्रामस्थांनी बंद पडले आहे. यावेळी उपसरपंच दिलीप काजळे, विनोद इथापे, ग्रामपंचायत सदस्य समीर पठाण, गणेश भावले, शांतीलाल साळवे, ज्ञानेश्वर म्हस्के, गोरखनाथ बनकर, नजीर पठाण आदींची उपस्थिती होती.
दीड महिना होऊन हे कामाची चौकशी होईना...
शेंदूरवादा भागात मागील दीड महिन्यापूर्वी कामे न करताच बिल काढण्याचा प्रकार घडला होता. याबाबत विविध तक्रारी ही संबंधित विभागाला दाखल आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत बंब व या विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती ही नेमली आहे. मात्र ही चौकशी येथेच थांबल्याने याबाबत वेगळीच चर्चा सुरू असून झालेल्या चुकीच्या कामाबाबत ठेकेदाराला व अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी समिती मुद्दाम उशीर केल्या जात असल्याचेही बोलले जात आहे.
गुरु धानोरा येथे सुरू असलेल्या आरोग्य केंद्राचे काम हे ठेकेदाराकडून अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता हे काम चुकीच्या पद्धतीने सुरू होते त्यामुळे सदरील कामाची चौकशी होईपर्यंत थांबवण्यात आले.
- समीर पठाण (ग्रामपंचायत सदस्य)
0 टिप्पण्या