अहमदनगर

शेवगाव-गेवराई रस्त्यावर भीषण अपघात: एकाचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक


बोधेगाव प्रतिनिधी 

शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील गर्जे वस्ती परिसरात सोमवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागलवाडी (ता. शेवगाव) येथील विशाल बबन खेडकर (वय २६) आणि समाधान राम ढाकणे (वय २५) हे दोघे दुचाकीवरून शेवगावहून गेवराई रस्त्याने आपल्या गावाकडे निघाले होते. गर्जे वस्तीच्या नजीक समोरून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली.

या अपघातात विशाल खेडकर याचा जागीच मृत्यू झाला असून समाधान ढाकणे गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले.

या भीषण अपघाताची नोंद उशीरापर्यंत शेवगाव पोलिस ठाण्यात झाली नव्हती. अपघातातील दोन्ही युवक अविवाहित असून, दोघेही कुटुंबातील एकुलते एक असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या