अहमदनगर

ड्राय डे'ला अवैध दारू विक्री: श्रीरामपुरात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई


श्रीरामपूर

श्रीरामपूर शहरात दसरा आणि महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने 'ड्राय डे' (मध्य विक्री बंदी) असतानाही अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने एकाच दिवशी शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून ही मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण २ लाख ४४ हजार ३४५ रुपये किमतीचा देशी आणि विदेशी दारूचा साठा तसेच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी किशोर भुतकर, अनिल भुतकर आणि अरुण अक्षय काळे या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान, शहरांतील नितीन वाईन्स आणि सेंट्रल वाईन शॉपमधून बंदीच्या दिवशी मध्यरात्री विक्रीसाठी दारूचा साठा बाहेर काढण्यात आला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कारवाई झालेले एक वाईन शॉप माजी नगरसेवकाच्या मालकीचे असल्याने या कारवाईला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

उत्पादन शुल्क विभागाने या तिन्ही आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत आणि पुढील कारवाईसाठी अधीक्षक अहमदनगर यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने शहरात केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध मध्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या