श्रीरामपूर
श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब गावात सोशल मीडियावर झालेली बदनामी आणि कथित गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीला कंटाळून १७ वर्षीय अनिकेत वडीतके या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाय कत्तलखान्याकडे नेत असल्याचा बिनबुडाचा आरोप करून कथित गोरक्षकांनी अनिकेतला अडवून बेदम मारहाण केली होती. या सगळ्या प्रकाराने मानसिकरित्या हादरलेल्या अनिकेतने हे टोकाचे पाऊल उचलले.
नेमके काय घडले? २७ ऑक्टोबर रोजी अनिकेत आपल्या काकांकडे एक गाय सोडण्यासाठी चिंचोली फाट्याहून टेम्पोतून निघाला होता. कोल्हार-राजुरी रोडवर कोल्हार येथील कथित गोरक्षक राकेश पवने, दिनेश राकेचा, प्रशांत राकेचा, संकेत खर्डे आणि त्यांच्या काही साथीदारांनी अनिकेतची गाडी अडवली. गाय खाटकाला विकण्यासाठी नेत असल्याचा आरोप करत त्यांनी अनिकेतला अमानुष मारहाण केली, त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि पैशांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी गाडीसह अनिकेतला थेट लोणी पोलीस ठाण्यात हजर केले. लोणी पोलिसांनी अनिकेतवर गुन्हा दाखल करून संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
घरी परतल्यावर अनिकेतने आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. स्वतःची झालेली बदनामी आणि मारहाणीचे दुःख असह्य झाल्याने घरी कोणी नसताना त्याने गळफास लावून आपले जीवन संपवले.
या घटनेचा निषेध म्हणून गळनिंब आणि परिसरातील धनगर समाजाचे शेकडो पुरुष-महिला अनिकेतचा मृतदेह घेऊन लोणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. रात्री उशिरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
लोणी पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा दोन दिवसांत कोल्हार येथे रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी दिला आहे.

0 टिप्पण्या