अहमदनगर

मेंढीला वाचवताना खाणीतील पाण्यात बुडून सख्ख्या भावा-बहिणीचा कोपरगावजवळ करुण अंत


कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे/डाऊच खुर्द परिसरात जुन्या खाणीच्या खोल पाण्यात बुडून सख्ख्या भावा-बहिणीचा अत्यंत करुण अंत झाला आहे. डाऊच खुर्द येथील सार्थक गणपत बडे आणि सुरेखा गणपत बडे (दोघेही रा. डाऊच खुर्द) अशी मृत भावंडांची नावे आहेत. गणपत बडे यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय असून, शनिवारी (दुपारी दोनच्या सुमारास) सार्थक आणि सुरेखा हे जुन्या खोदकाम केलेल्या खाणीजवळ मेंढ्या चारत असताना ही दुःखद घटना घडली. या घटनेमुळे डाऊच खुर्द परिसरासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मेंढ्या पाणी पिण्यासाठी खाणीजवळ गेल्या असता, त्यातील एक मेंढी पाण्यात पडली. या मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखा गणपत बडे हिने प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि पाय घसरल्याने ती खाणीच्या खोल पाण्यात बुडू लागली. बहिणीला पाण्यात बुडताना पाहून सार्थक याने क्षणाचाही विलंब न लावता तिला वाचवण्यासाठी खाणीत उडी घेतली. परंतु, खाणीत पाण्याचा साठा जास्त होता आणि दलदलही होती. खोल पाणी आणि दलदल यामुळे घाबरून गेलेले हे दोघेही सख्खे भाऊ-बहीण पाण्यात बुडाले. जवळच कपडे धुण्यासाठी थांबलेल्या महिलांनी आरडाओरड करून ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील मीरा रोकडे, उपसरपंच वसिम शेख आणि डॉ. गोरक्षनाथ रोकडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना त्वरित कळवले. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील ग्रामस्थ आणि तरुणांच्या मदतीने दोन्ही मृतदेह खाणीतून बाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर डाऊच खुर्द येथे अत्यंत शोकाकुल आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद घटनेमुळे गणपत बडे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कुकडे हे करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या