अहमदनगर

अनधिकृत मुरूम वाहतूक भोवली; कारेगावचे सरपंच आनंदा वाघ यांची अपात्रता कायम


श्रीरामपूर 

श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आनंदा गोरक्षनाथ वाघ यांनी दाखल केलेले अपील ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी फेटाळून लावले आहे. त्यामुळे, नाशिक विभागीय आयुक्तांनी दिलेला त्यांच्या अपात्रतेचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. सरपंच वाघ यांनी आपल्या अपीलमध्ये विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र, सुनावणी दरम्यान महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या अहवालातील तथ्यांवरून हे सिद्ध झाले की, सरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांनी सोपान दगडू भापकर यांच्या मालकीच्या गट क्रमांक २८० मध्ये अनधिकृतपणे मुरूम वाहतूक करून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला. या कृत्याबद्दल महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर १ लाख ४१ हजार रुपयांचा दंड देखील आकारला होता. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी हा दंड कायम ठेवला होता. त्यामुळे, ग्रामविकास मंत्र्यांनीही हा दंड आणि गैरवर्तनाचा आरोप वैध ठरवत वाघ यांना सरपंचपदासाठी अपात्र घोषित केले. सरपंच वाघ यांचे वर्तन प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना कर्तव्यात दुर्लक्ष करणारे, नियमबाह्य, अशोभनीय आणि बेजबाबदार होते, असे मंत्र्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) नुसार ते कारवाईस पात्र ठरले आहेत. विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या