अहमदनगर

'शिंदे गटाचे २२ आमदार भाजपच्या वाटेवर' - आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा


मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत असून शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे तब्बल २२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार बसले असल्याचा सनसनाटी दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्यात अद्याप विरोधी पक्षनेता ठरलेला नसतानाही सरकारला कशाची भीती सतावतेय, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, भास्कर जाधवांच्या नावाबद्दलच्या बातम्या या केवळ महायुतीमधूनच पसरवल्या गेलेल्या अफवा असल्याचे सांगत, गेल्या काही महिन्यांत या २२ आमदारांना भरघोस निधी मिळाला असून ते केवळ मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा गंभीर आरोपही आदित्य यांनी केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या या विधानानंतर शिंदे गट आणि भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाठ यांनी आदित्य ठाकरेंना आधी त्यांचे स्वतःचे २० आमदार टिकवण्याचा सल्ला दिला, तर निलेश राणे यांनी 'आदित्य ठाकरेंनी आता ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला आहे का?' असा टोला लगावला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दाव्याला पूर्णपणे फेटाळून लावले आहे. "असे दावे करायचे झाल्यास उद्या मीही म्हणेन की आदित्य यांचे २० आमदार आमच्याकडे यायला तयार आहेत," असे म्हणत फडणवीसांनी शिंदे सेना हाच त्यांचा मित्रपक्ष आणि खरी शिवसेना असल्याचे स्पष्ट केले. मित्रपक्षाला फोडण्याचे राजकारण भाजप करत नसून महायुती भविष्यात अधिक मजबूत होईल, असे सांगत त्यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या