बोधेगाव प्रतिनिधी
आर्थिक अडचणींवर मात करीत संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाला सुरुवात केली असून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी अधिकाधिक ऊस गाळपास देऊन हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी केले.
कारखान्याच्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन ज्येष्ठ पत्रकार रावसाहेब निकळजे, बाळासाहेब खेडकर, अनिल कांबळे, उद्धव देशमुख, जयप्रकाश बागडे, इसाक शेख यांच्या शुभहस्ते तसेच अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी बोलताना ढाकणे म्हणाले की, “गळीत हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी आम्ही जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करणार आहोत. हा हंगाम अत्यंत अडचणीत सुरू केला असूनही कामगार, ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांचा लाभ होण्यासाठी कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील. उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणेच योग्य मोबदला देण्यात येईल.”
कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे, ज्येष्ठ संचालक सुरेशचंद्र होळकर, डॉ. प्रकाश घनवट, त्रिंबक चेमटे, शहाजी जाधव, मोहनराव दहिफळे, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपट केदार, चिफ इंजिनियर प्रवीण काळोशे, चिफ केमिस्ट रामनाथ पालवे, आकाऊंट प्रमुख तीर्यराज घुंगरड, शेतकी विभाग प्रमुख अभिमन्यू विखे, परचेस अधिकारी तुकाराम वारे, सिव्हिल विभाग प्रमुख संजय चेमटे, संगणक विभाग प्रमुख भगवान सोनवणे, केनयार्ड सुपरवायझर किसन पोपळे सुरक्षा विभाग प्रमुख केसभट तसेच मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते
पत्रकारांना दुसऱ्यांदा सन्मान
केदारेश्वर साखर कारखान्याच्या इतिहासात पत्रकारांना सन्मानाने स्थान देण्याची परंपरा आजही कायम आहे. संस्थापक स्व बबनराव ढाकणे यांनी कारखान्यावर संपादक स्व. दा. प. आपटे, ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी, रामदास ढमाले यांच्या पाठोपाठ दुसऱ्यांदा ग्रामीण पत्रकारांना साखर पोत्याच्या पूजनासाठी मानसन्मानाने निमंत्रित करण्यात आले.
विधिवत पूजा करून पत्रकारांचा गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये पत्रकारांना अशा प्रकारचा मान देणारा सर्वात संवेदनशील व सामाजिक बांधिलकी जपणारा कारखाना म्हणजे केदारेश्वर, अशी सर्वसाधारण भावना व्यक्त झाली आहे.
साखर पोत्याच्या पूजनावेळी ग्रामीण भागातील कार्यरत पत्रकारांचा सन्मान हा केदारेश्वर कारखान्याच्या मानवी मूल्यांचे दर्शन घडवणारा आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा उपक्रम ठरला आहे.


0 टिप्पण्या