अहमदनगर

विमान कंपन्यांची मनमानी सुरूच; सरकारी 'भाडे मर्यादा' तोडून वसूल करतायेत जादा दर, प्रवासी त्रस्त


नवी दिल्ली

इंडिगो विमान कंपनीच्या मनमानीमुळे देशांतर्गत हवाई प्रवासाचे भाडे गगनाला भिडल्यावर, नागरी उड्डयन मंत्रालयाने ६ डिसेंबर रोजी हस्तक्षेप करत प्रवासाच्या अंतराच्या आधारावर जास्तीत जास्त बेस फेअरची मर्यादा (Cap) निश्चित केली होती. सरकारने हे नियम कठोरपणे लागू करण्याचा दावा केला असला तरी, सोमवारी अनेक मार्गांवर परिस्थिती पूर्णपणे उलट दिसली आहे. प्रमुख महानगरीय मार्गांवर भाडे नियंत्रणात आले असले तरी, लहान शहरे आणि थेट विमानांची सोय नसलेल्या मार्गांवर ही मर्यादा धाब्यावर बसवून अनेक पटीने अधिक भाडे वसूल केले जात आहे.

उड्डयन मंत्रालयाने ५०० किमी पर्यंत ७५०० रुपये, ५०१ ते १००० किमी पर्यंत १२००० रुपये, १००१ ते १५०० किमी पर्यंत १५००० रुपये आणि १५०० किमी पेक्षा जास्त अंतरासाठी १८००० रुपये अशी कमाल भाड्याची मर्यादा निश्चित केली होती. मात्र, विमान कंपन्यांनी या नियमातील एका त्रुटीचा फायदा घेतला आहे. कनेक्टिंग (जोडणाऱ्या) विमानांना ही मर्यादा लागू होईल की नाही, हे नियमावलीत स्पष्ट केलेले नव्हते. त्यामुळे ही मर्यादा फक्त थेट विमानांना (Direct Flights) लागू होते, कनेक्टिंग विमानांना नाही, असा युक्तिवाद कंपन्या करत आहेत. या एकाच त्रुटीमुळे सरकारने ठरवलेला 'कॅप फॉर्म्युला' पूर्णपणे कुचकामी ठरला असून लहान शहरांतील प्रवाशांकडून अनेक पटीने अधिक पैसे उकळले जात आहेत.

चंदीगड, लेह, आगरतळा, पुणे, गोरखपूर आणि कांगडा यांसारख्या शहरांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची स्थिती बिकट झाली आहे. या शहरांमध्ये थेट विमाने कमी असल्याने कनेक्टिंग तिकिटांचे दर कमाल मर्यादेपेक्षा तीन ते चार पट जास्त आहेत. उदाहरणार्थ, चंदीगड ते जयपूर हे अंतर ४८४ किमी असून कमाल भाडे ७५०० रुपये असायला हवे, पण १० डिसेंबरसाठी एअर इंडियाचे तिकीट २८,००७ रुपयांवर पोहोचले आहे. याच धर्तीवर, लखनऊ ते मुंबईचे मंगळवारचे इंडिगोचे भाडे १८,००० रुपये झाले आहे. याशिवाय, एअरलाइनच्या वेबसाइटपेक्षा ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट्स (OTAs) च्या वेबसाइटवर हेच तिकीट ३० ते ५० टक्क्यांनी अधिक महाग विकले जात असून, यातून एअरलाइन्स आणि ओटीए मिळून अतिरिक्त कमिशन कमावत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या