नवी दिल्ली
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी आज नवी दिल्लीतील रेल भवन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा प्रारंभ केला. तिरुपती-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस सुरू झाल्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधील रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. याचे अनेक दूरगामी फायदे मिळतील. त्याचप्रमाणे, आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टी भागातून भाविकांना थेट शिर्डीला घेऊन जाणारी ही पहिली रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. भारतातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्रे असलेल्या तिरुपती आणि शिर्डी यांना थेट जोडणाऱ्या या सेवेमुळे यात्रेकरूंची उत्तम सोय होणार आहे.
शिर्डी-तिरुपती प्रवासासाठी लागणार ३० तास
या नवीन रेल्वेमुळे तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळेल, रेल्वे मार्गालगतच्या आर्थिक उलाढाली वाढतील आणि प्रादेशिक विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, ही गाडी प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक आणि त्रासमुक्त आंतरराज्य प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देईल, ज्यामुळे यात्रेकरूंना रेल्वे प्रवासाचा चांगला अनुभव मिळेल. या नव्या साप्ताहिक रेल्वेगाडीने तिरुपती आणि शिर्डीदरम्यान एका दिशेचा प्रवास पूर्ण करण्यास सुमारे ३० तास लागतील.
तिरुपती-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसचा शुभारंभ हा चार राज्यांमधील भाविकांसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे व्ही. सोमन्ना यांनी सांगितले. ते म्हणाले की, भारतीय रेल्वे केवळ वाहतुकीचे साधन म्हणून काम करत नाही, तर विविध प्रदेश आणि संस्कृतींना जोडते आणि देशाची जीवनरेखा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते.
तिरुपती आणि शिर्डी ही तीर्थक्षेत्रे आता थेट रेल्वेने जोडली गेली आहेत. या मार्गावर नेल्लोर, गुंटूर, सिकंदराबाद, बिदर, मनमाडसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी ३१ थांबे असतील, अशी माहिती व्ही. सोमन्ना यांनी यावेळी दिली. या सेवेमुळे तीर्थक्षेत्र पर्यटन, कनेक्टिव्हिटी तसेच या मार्गालगतच्या परिसरातील आर्थिक गतिविधींना चालना मिळेल, असे ते म्हणाले. या नवीन रेल्वेगाडीमुळे महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि सिकंदराबाद या परिसरांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच, यामुळे शिवभक्तांसाठी महत्त्वाचे असलेले परळी वैजनाथ हे तीर्थक्षेत्रदेखील जोडले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

0 टिप्पण्या