धुळे
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पोलीस प्रशासनाने अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणून सोडणारी एक मोठी कारवाई केली आहे. चक्क वनविभागाच्या जमिनीवरच बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या गांजाच्या शेतीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तब्बल १ कोटी ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जाळून खाक केला आहे. शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना जामण्यापाणी शिवारातील वनक्षेत्रात गांजाची लागवड झाल्याची गुप्त माहिती मिळाली होती. हा परिसर अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ असल्याने जप्त केलेला गांजा पोलीस ठाण्यापर्यंत किंवा शहरात वाहून आणणे हे एक मोठे आव्हान होते. या समस्येवर तोडगा म्हणून पोलिसांनी तात्काळ न्यायालयाशी संपर्क साधला आणि विशेष परवानगी मिळवली. त्यानंतर कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जंगलातच पंचनामा करून गांजाची ही भलीमोठी शेती आगीच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही धडक कारवाई प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली. पहिल्या कारवाईत जामण्यापाणी वनक्षेत्रातील भोरखेडा येथे सुमारे ४० हजार स्क्वेअर फूट जागेवर पसरलेली गांजाची शेती उध्वस्त करण्यात आली, ज्याची किंमत ४२ लाखांच्या घरात होती. तर दुसऱ्या कारवाईत बभळाज परिसरात ८२ गुंठा क्षेत्रात गांजा लागवड आढळली. येथे पोलिसांच्या भीतीमुळे तस्करांनी पुरावा नष्ट करण्यासाठी पीक स्वतःच कापून टाकले होते, मात्र पोलिसांनी ते शोधून काढले. या ठिकाणी ६३ लाख ८० हजार रुपये किमतीचा तब्बल १,२७६ किलो गांजा जप्त करण्यात आला. या संपूर्ण 'ऑपरेशन क्लीन' मध्ये धुळे पोलिसांनी वनविभागाच्या हद्दीतील एकूण १२२ गुंठा जमीन नशामुक्त केली असून दोन्ही ठिकाणचा मिळून २,१२५ किलो म्हणजेच २१ क्विंटलहून अधिक गांजा नष्ट केला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या रॅकेटच्या मूळ सूत्रधारांचा शोध घेत आहेत.

0 टिप्पण्या