अहमदनगर

भारतीय तांदूळ आणि कॅनेडियन खतावर लवकरच नवे 'टॅरिफ' लागणार - डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा


नवी दिल्ली

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी स्पष्ट संकेत दिले आहेत की ते भारतीय तांदूळ आणि कॅनडातून येणाऱ्या खतावर (फर्टिलायझर) लवकरच नवे शुल्क (टॅरिफ) लावू शकतात. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेच्या शेतकऱ्यांसाठी १२ अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले की, परदेशी आयातीमुळे अमेरिकेचे शेतकरी त्रस्त झाले आहेत आणि आता यावर कठोर पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. ट्रम्प यांनी आरोप केला की भारतसह काही देश अमेरिकेत तांदूळ 'डम्प' करत आहेत, म्हणजे अत्यंत स्वस्त दरात तांदूळ विकत आहेत, ज्यामुळे अमेरिकेतील तांदूळ उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. "ते असे करू शकत नाहीत, आम्ही याला परवानगी देणार नाही," अशा शब्दांत त्यांनी ताकीद दिली.

अमेरिका आणि व्हिएतनाम तसेच थायलंडमधून येणाऱ्या स्वस्त तांदळामुळे स्थानिक बाजारपेठ उद्ध्वस्त होत असल्याची आणि किंमती घसरत असल्याची अमेरिकन शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून तक्रार आहे. "डम्पिंग होत आहे, हे मी इतरांकडूनही ऐकले आहे. आम्ही याची दखल घेऊ," असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. या वर्षाच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी भारताकडून येणाऱ्या अनेक वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत शुल्क लावले होते, ज्याचे कारण भारताचे जास्त आयात शुल्क आणि रशियाकडून तेल खरेदी करणे हे सांगितले गेले होते. या आधीच्या कारवाईनंतर आता तांदळावर नवे शुल्क लागू होण्याची दाट शक्यता आहे. तांदळासोबतच ट्रम्प यांनी कॅनडातून येणाऱ्या खतावरही कठोर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेत वापरले जाणारे बरेच खत कॅनडातून येते. "आवश्यकता भासल्यास, आम्ही त्यावरही भारी शुल्क लादू. यामुळे अमेरिकेतच खताचे उत्पादन वाढेल," असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या