मुंबई
महाराष्ट्रात महायुती सरकारची 'लाडकी बहीण योजना' गेमचेंजर ठरली असून आता या योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांची रक्कम आता एकाच वेळी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे. नोव्हेंबर २०२५ चा १५०० रुपयांचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेक महिलांना आपल्या कागदपत्रांमध्ये किंवा केवायसीमध्ये (KYC) काही त्रुटी असल्याचा संशय वाटत होता, कारण सहसा महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होतात. मात्र, आता सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३००० रुपये एकत्रितपणे देण्याची तयारी केली आहे, त्यामुळे १७ वा आणि १८ वा हप्ता एकत्र जमा होणार आहे.
या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेने तिचे केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे, अन्यथा पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात. सध्या अनेक बँक खात्यांचे केवायसी अपडेट नसल्याने पैसे अडकले आहेत. तसेच राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे आणि २१ डिसेंबरला निकाल लागणार आहेत. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून सरकार सावधगिरीने पावले उचलत आहे. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थेट दोन महिन्यांची रक्कम पाठवण्याचे नियोजन असून, या निर्णयाचा महायुतीला निवडणुकीत राजकीय फायदा मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

0 टिप्पण्या