श्रीरामपूर
श्रीरामपूर शहरात बाबरपुरा चौक परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे, जिथे पाण्याच्या टाकीवरून खाली पडून रिजवान रशीद शहा (वय 20) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पाण्याच्या टाकीवर वॉचमन नसल्यामुळे परिसरातील मुले आणि तरुण अनेकदा टाकीवर चढत असतात. आज रिजवान टाकीवर चढत असताना पाय घसरून खाली कोसळला आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली, मात्र तरुणास मृत घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे, याच टाकीजवळ यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमार्फत या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

0 टिप्पण्या