अहमदनगर

एका दिवसात दोन बिबटे जेरबंद: श्रीरामपूरच्या नागरिकांना अंशतः दिलासा


श्रीरामपूर 

श्रीरामपूर येथील मोरगेवस्ती परिसर आणि साई श्रद्धा कॉलनी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्यांना अखेर वनविभागाच्या पथकाने एकाच दिवसात जेरबंद केले आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रशासकीय अधिकारी श्री. सागर जावळे यांच्या घरासह संपूर्ण परिसरात बिबट्यांची वारंवार दिसणारी वर्दळ नागरिकांच्या मोठ्या भीतीचे कारण ठरली होती. या भागात एक मादी बिबट्या आणि तिची तीन पिल्ले फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळले होते. १९ डिसेंबर रोजी सकाळी ५:४५ च्या सुमारास, वनविभागाच्या पथकाने लावलेल्या पिंजऱ्यात त्यापैकी एक पिल्लू अडकले. त्यानंतर, रात्री अंदाजे ९:३० वाजता दुसरे पिल्लूही जेरबंद झाले. वन विभागाने रात्री १०:४५ वाजता पकडलेल्या बिबट्याच्या पिल्लांना पुढील कार्यवाहीसाठी सोबत घेतले. सध्या मादी बिबट्या अजूनही मोकळी असून, ती आपल्या पिल्लांना शोधत लोकवस्तीच्या बाजूने फिरत आहे. यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या १५ दिवसांपासून श्री. सागर जावळे हे स्वतःच्या खर्चातून कोंबडीचा वापर करून पिंजऱ्यात ठेवण्यासाठी मदत करत होते. दुसऱ्या पिल्लाला पकडताना, जावळे यांनी संध्याकाळी दोन कोंबड्या पिंजऱ्यात ठेवून आल्यावर फाटक जोरात आदळले आणि लगेचच दुसरे बिबट्याचे पिल्लू हाती लागले. नागरिकांच्या सततच्या तक्रारी आणि पाठपुराव्यानंतर वनविभागाने तातडीने कारवाई करत पिंजरे लावले आणि सलग कारवाईत दोन पिल्लांना सुरक्षितपणे पकडण्यात यश मिळवले. ही पकडलेली पिल्ले पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. दोन बिबटे पकडल्यामुळे मोरगेवस्ती परिसर आणि साई श्रद्धा कॉलनीतील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, मादी बिबट्या अजूनही मोकाट फिरत असल्याने वनविभागाने गस्त वाढवावी आणि नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना दक्षता घ्यावी, असे आवाहन कायम आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या