अवैध क्लिनिक चालवणाऱ्यांवर गुन्हा दाखल
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील कोठी या ठिकाणी किडनी स्टोनच्या (मूत्रपिंडातील खडा) शस्त्रक्रिया केल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवैध पद्धतीने क्लिनिक चालवणाऱ्या काका-पुतण्याने कथितरित्या यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून महिलेचे किडनी स्टोनचे ऑपरेशन केले होते. ऑपरेशन झाल्यानंतर काही वेळातच महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले आहे.
नेमके प्रकरण काय आहे? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कोठी पोलीस स्टेशन परिसरातील डफरापूर मजरे सैदनपूर येथील आहे. येथील तेहबहादुर रावत यांच्या पत्नी मुनिशरा रावत यांना किडनी स्टोनचा त्रास होता. त्यामुळे त्यांना ५ डिसेंबर रोजी श्री दामोदर औषधालय कोठी येथे उपचारासाठी नेण्यात आले. क्लिनिकचा संचालक ज्ञान प्रकाश मिश्र याने महिलेच्या पोटदुखीचे कारण किडनी स्टोन असल्याचे सांगून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. ऑपरेशनचा खर्च २५ हजार रुपये सांगण्यात आला होता आणि महिलेच्या पतीने शस्त्रक्रियेपूर्वी २० हजार रुपये जमा केले होते.
पोटात खोलवर चिरा आणि नसा कापल्याचा आरोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने तक्रारीत गंभीर आरोप केला आहे की, झोलाछाप डॉक्टर ज्ञान प्रकाश मिश्र हा दारूच्या नशेत होता आणि त्याने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून आपल्या पत्नीचे ऑपरेशन सुरू केले. नशेत असलेल्या या डॉक्टरने महिलेच्या पोटात खोलवर चिरा दिल्या आणि अनेक नसा कापल्या, असा आरोप पतीने केला आहे. ऑपरेशननंतर लगेचच दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू झाला. ज्ञान प्रकाश मिश्र याचा पुतण्या विवेक कुमार मिश्र हा उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील एका आयुर्वेदिक रुग्णालयात सरकारी कर्मचारी म्हणून काम करतो आणि याच आधारावर तो अनेक वर्षांपासून हे अवैध क्लिनिक चालवत असल्याचा आरोप पतीने केला आहे.
पोलिसांनी काय कारवाई केली? या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) पाठवला. सामुदायिक आरोग्य केंद्राच्या अधीक्षकांनी मंगळवारी तातडीने कारवाई करत क्लिनिकचे भवन सील केले आणि त्यावर नोटीस लावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी असलेल्या या काका-पुतण्याविरुद्ध खुनाच्या उद्देशाने गुन्हा (इरादतन हत्या) दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

0 टिप्पण्या