मुंबई
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघातामागे घातपाताची शक्यता व्यक्त केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "ममता बॅनर्जी या मानसिकदृष्ट्या पंगू झाल्या आहेत, महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही," अशा तिखट शब्दांत बावनकुळे यांनी आपला संताप व्यक्त केला. आजच्या दुःखाच्या प्रसंगी असे राजकारण करणे चुकीचे असून त्यांनी महाराष्ट्राची बदनामी थांबवावी, असेही ते म्हणाले.
ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर संशय व्यक्त करताना म्हटले होते की, अजित पवार लवकरच पुन्हा शरद पवार यांच्या गटात सामील होणार होते आणि त्यापूर्वीच हा अपघात झाला. या प्रकरणाची सीबीआय किंवा इतर यंत्रणांमार्फत नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. देशात नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून यंत्रणा विकल्या गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या विधानामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अजित पवार यांच्यासारखा कष्टाळू नेता गमावणे हा मोठा धक्का असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संपूर्ण देश या दुर्दैवी घटनेने हादरलेला असताना राजकीय वर्तुळातून आता चौकशीच्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत.

0 टिप्पण्या