रेवा
मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे एका अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेम खेळण्यासाठी पैशांची गरज असल्याने या मुलाने स्वतःच्याच आईचे तब्बल १५ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. एका लग्नसमारंभासाठी आलेल्या या महिलेने आपले दागिने एका टिफिनमध्ये ठेवले होते, जिथून मुलाने ते गायब केले. सुरुवातीला या चोरीमुळे संपूर्ण कुटुंब हादरले होते, मात्र पोलिसांनी तपास सुरू केला असता धक्कादायक सत्य समोर आले.
पोलिसांनी संशयावरून मुलाच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले असता तो सिधी जिल्ह्यात असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने अनेक तास पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, अधिक कडक चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि चोरलेले दागिने सिधी येथील एका मित्राच्या घरी लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व दागिने हस्तगत केले आहेत. ऑनलाइन गेममधील हार-जीत आणि पैशांच्या देवाणघेवाणीमुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

0 टिप्पण्या