तेलंगणा
तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नारायणखेड विभागातील पंचगाम गावातील एका मंदिराचा पुजारी मंदिर परिसरात झेंडूच्या फुलांच्या झाडांच्या आड गांजाची लागवड करत असल्याचे समोर आले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या (DTF) पथकाने या प्रकरणाचा छडा लावत पुजाऱ्याला अटक केली असून सुमारे ७० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवुती नागय्या (४८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो स्वतःला आध्यात्मिक गुरू मानत असे. पंचगाम गावातील मंदिराचा पुजारी म्हणून काम पाहत असताना त्याने गांजाची बेकायदेशीर शेती आणि विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने झेंडूच्या फुलांच्या बागेमध्ये गांजाची झाडे लावली होती.
उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी या ठिकाणी छापा टाकला असता, तिथे गांजाची ६८५ झाडे आढळून आली. आरोपी हा गांजा वाळवून त्याचे पाकीट तयार करून विकत असे. या कारवाईत १७.७४१ किलो सुका गांजा, ८९७ ग्रॅम गांजाचे बियाणे, ३० हजार रुपयांची रोख रक्कम, डिजिटल वजन काटा आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. डीसी मेडक आणि डीपीईओ संगारेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड टाकण्यात आली.
भक्तीच्या नावाखाली अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या या पुजाऱ्याच्या कारनाम्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून यामागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

0 टिप्पण्या