श्रीरामपूर
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे १९ मार्च रोजी मध्यरात्री झालेल्या धाडसी घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी सुरेखा माधव भोर यांच्या घरात पाच अज्ञात इसमांनी दरवाजा तोडून प्रवेश केला होता आणि घरातील सदस्यांना मारहाण करून सोन्याचे दागिने व मोबाईल असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी तपासाचे आदेश दिले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथे छापा टाकून बबुशा पिंग्या काळे, शुभम पिंग्या काळे आणि रवि लाला भोसले या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांनी नाशिक आणि पुणे जिल्ह्यातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे मान्य केले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक मोहन बोरसे आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली असून पुढील तपास सुरू आहे.

0 टिप्पण्या