अहमदनगर

देशात वादळाचे संकट; अनेक राज्यांमध्ये १०० किमी वेगाने वारे वाहणार, हवामान विभागाकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी


नवी दिल्ली

देशभरातील हवामानात आगामी काही तासांत मोठा बदल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. सध्या देशातील अनेक भागांमध्ये नागरिक कडाक्याच्या उन्हाचा सामना करत असतानाच, आता अनेक राज्यांवर वादळाचे सावट निर्माण झाले आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून वेगाने पुढे सरकत असल्यामुळे हवामान विभागाने विविध राज्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत अनेक राज्यांमध्ये चक्क १०० ते ११० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, दिल्ली आणि हरियाणाच्या वातावरणात २९ मे रोजी मोठा बदल पाहायला मिळेल. या भागात ८० ते १०० किमी प्रतितास वेगाने धुळीचे वादळ येण्याची शक्यता असून ३० मे रोजी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर प्रदेशातही अशीच गंभीर परिस्थिती राहण्याची शक्यता असून २९ मे रोजी ६० ते ८० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, तसेच पश्चिम उत्तर प्रदेशात गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय, बिहारमध्ये २८ आणि २९ मे रोजी अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. झारखंड राज्याला २८ मे ते १ जून या पाच दिवसांच्या कालावधीसाठी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा आणि धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्येही २८ आणि २९ मे रोजी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून, तिथे ५० ते ७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या