अहमदनगर

खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? धाराशिवमध्ये राजकीय घडामोडींना वेग!


धाराशिव

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे गटाची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पक्षांतराची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी असल्याचे बोलले जात असून, या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काही दिवसांपूर्वीच ओमराजे यांनी आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज त्यांनी धाराशिवमधील गोवर्धनवाडी येथील आपल्या मूळ गावी मतदारसंघातील सर्व तालुक्यांमधील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत ओमराजेंनी कार्यकर्त्यांशी बंद दाराआड सविस्तर चर्चा केली, ज्यामध्ये मतदारसंघातील विकासकामांसाठी आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी ओमराजेंनी शिंदे गटात प्रवेश करावा, असा सूर बहुतांश कार्यकर्त्यांनी आळवला. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे जिल्ह्यात वाढते वर्चस्व आणि सध्या सत्ता नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळवण्यात येत असलेल्या अडचणी, या पार्श्वभूमीवर ओमराजेंनी सत्तेत जाण्याचा विचार केल्याचे समजते. सत्तेत गेल्याशिवाय लोकांची कामे करता येणार नाहीत, अशी भावना त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. याच दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री तानाजी सावंत हे थेट ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी गोवर्धनवाडी येथे पोहोचले. ओमराजे निंबाळकर हे विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेणार असून ते शिवसेनेत येणार आहेत, असा गौप्यस्फोट सावंत यांनी केला. माध्यमांशी बोलताना तानाजी सावंत यांनी सांगितले की, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याप्रकरणाचा कोर्टाचा निकाल लागल्यानंतर त्यांचे ओमराजेंशी कौटुंबिक संबंध असल्याने ते या भेटीसाठी आले आहेत. तसेच, ओमराजेंना पक्षात आणण्याची जबाबदारी असलेल्या 'ऑपरेशन टायगर'बाबत विचारले असता, त्यांनी आपल्याला या मोहिमेची जबाबदारी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. गोवर्धनवाडीतील या बैठकीनंतर कार्यकर्त्यांची भाषणे सुरू असून, ओमराजे निंबाळकर यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश आता जवळपास निश्चित मानला जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या