अहमदनगर

शेवगावच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांची पोलिसांत फिर्याद; सोशल मीडियावर बदनामी, संपादित फोटो प्रसारित केल्याचा आरोप


शेवगाव  प्रतिनिधी

शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट, स्टेटस, संपादित छायाचित्रे तसेच आंदोलनांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करत शेवगाव पोलीस ठाण्यात सविस्तर फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी उमेश वसंतराव भालसिंग (रा. वाघोली, ता. शेवगाव) व शिवाजीराव भिसे यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली असून, पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत.

फिर्यादीनुसार, २९ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती शेवगाव येथे करण्यात आलेल्या मुंडन आंदोलनादरम्यान त्यांना "भ्रष्ट अधिकारी" म्हणून संबोधून बदनामी करण्यात आली. संबंधित अभियानाच्या ग्रामपंचायत मूल्यांकन प्रक्रियेशी आपला कोणताही संबंध नसतानाही चुकीचे आरोप करून समाजात संभ्रम निर्माण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

त्यानंतर बीड जिल्हा परिषद परिसरात झालेल्या आंदोलनात शासनाविरोधात आक्षेपार्ह मजकूर वापरण्यात आला. तसेच त्या आंदोलनाचे छायाचित्र मोबाईल स्टेटसवर टाकून "गटविकास अधिकारी केज व बीडीओ शेवगाव यांचा निषेध" असा उल्लेख करत आपली बदनामी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

फिर्यादीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, १५ जून २०२६ रोजी शेवगाव पंचायत समितीसमोर झालेल्या आंदोलनावेळी "बीडीओ सोनल शहा यांची उच्चस्तरीय चौकशी करा", "भ्रष्ट बीडीओला निलंबित करा" अशा आशयाचे स्टेटस प्रसारित करण्यात आले. तसेच फेसबुकवरील त्यांचे छायाचित्र परवानगीशिवाय वापरून संपादित पोस्ट तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

१६ जुलै रोजी ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिल्यानंतर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने निषेधात्मक पोस्ट टाकण्यात आल्या. त्यामुळे कर्मचारीवर्गात द्वेषभावना निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

याशिवाय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाल्यानंतरही "बीडीओ सोनल शहा यांची बदली", "जनआंदोलनाला अखेर यश" अशा आशयाच्या पोस्ट व बातम्या सोशल मीडियावर प्रसारित करून आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप सोनल शहा यांनी तक्रारीत केला आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या मूल्यांकनाशी आपला कोणताही संबंध नसतानाही जाणीवपूर्वक बदनामी करून ग्रामविकास विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी तसेच नागरिकांमध्ये आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याने आपण कायदेशीर कारवाईची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.-



शेवगाव तालुक्यातील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या ग्रामपंचायत मूल्यांकन प्रक्रियेशी माझा कोणताही संबंध नव्हता. तरीही माझ्याविरुद्ध बिनबुडाचे व बदनामीकारक आरोप करून सोशल मीडियाद्वारे माझी प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे उपलब्ध कायदेशीर तरतुदीनुसार मी तक्रार दाखल केली असून, न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे.

- सोनल शहा,

गटविकास अधिकारी पंचायत समिती, शेवगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या