जयपूर
राजस्थानमधील कोटपुतली येथील कारागृहात अन्नात कांदा आणि हिरवी मिरची न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कैद्यांनी अन्नत्याग करत उपोषण सुरू केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रशासनाने ही मागणी पूर्ण न केल्याने अर्धा डझन कैद्यांनी शेव्हिंग ब्लेडने स्वतःचे हात कापून घेतले, ज्यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली.
अतिरक्तस्रावामुळे हे सर्व कैदी गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली आहे. परिस्थिती बिकट झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दोन कैद्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, तर उर्वरित चार जणांवर कारागृहातच प्राथमिक उपचार करण्यात आले.
तुरुंग अधीक्षक माना राम गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवणात कांदा अन् मिरची मिळावी या मागणीसाठी काही कैद्यांनी शुक्रवारी संप आणि उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र कैदी आपल्या हट्टावर ठाम राहिले. यानंतर सहा कैद्यांनी स्वतःच्या हातावर ब्लेडने वार केले. कैद्यांपर्यंत हे शेव्हिंग ब्लेड नेमके कसे पोहोचले, याची सखोल चौकशी आता प्रशासन करत आहे.

0 टिप्पण्या