अहमदनगर

ऑनलाइन डिलिव्हरीसोबत घरात शिरला झुरळ; अभिनेत्री श्वेता तिवारीने थेट एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंकडे मांडली व्यथा


मुंबई

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ऑनलाइन डिलिव्हरी सेवांच्या अन्न सुरक्षेवर आणि स्वच्छतेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिने एका ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून काही पेय मागवले होते, मात्र त्या पॅकेजिंगसोबत तिच्या घरात एक जिवंत झुरळ पोहोचल्याचा दावा तिने केला आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ तिने स्वतःच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला असून त्यात ते झुरळ घरात फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने उपरोधिक टिप्पणी करत म्हटले की, पेयांसोबत आता घरात झुरळही यायला लागले आहेत, त्यामुळे या प्रकरणात थेट एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेजींना टॅग करून त्यांना याकडे लक्ष देण्याची विनंती करायला हवी. श्वेताने या व्हिडिओमध्ये संबंधित डिलिव्हरी कंपनीसोबतच महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही टॅग केले आहे. सध्या मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात हॉटेल्स आणि क्विक-कॉमर्स गोदामांची झाडाझडती घेऊन अन्न सुरक्षेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम सुरू आहे. याच मोहिमेदरम्यान अभिनेत्रीने थेट एफडीए आयुक्तांना साकडे घातल्यामुळे हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या