अहमदनगर

नीला विखे पाटील यांचा ऐतिहासिक विजय; स्वीडनच्या संसदेवर खासदार म्हणून झाली निवड!


मुंबई

महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या विखे पाटील घराण्यातील कन्या नीला विखे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक यश मिळवले आहे. स्वीडनमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्टॉकहोम शहर मतदारसंघातून त्या स्वीडनच्या संसदेवर (रिक्सदाग) खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी ग्रीन पार्टीच्या (Green Party) उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली होती.

स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या संसदेत डाव्या विचारांच्या विरोधी पक्षांच्या आघाडीने १७६ जागांसह निसटते बहुमत संपादन केले असून, त्यात नीला विखे पाटील यांनीही दणदणीत विजय मिळवत संसदेत प्रवेश केला आहे. नीला या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या, माजी केंद्रीय मंत्री स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत. तसेच आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या त्या पणती आहेत.

त्यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला तरी त्यांचे बालपण अहिल्यानगर (अहमदनगर) येथे गेले. त्यांनी गोटेन्बर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेत पदवी व एमबीए पूर्ण केले आहे. स्वीडनच्या राजकारणात त्या गेल्या अनेक वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात तत्कालीन पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात वित्त, कर आणि गृहनिर्माण विषयांवर राजकीय सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय त्यांनी स्टॉकहोम सिटी कौन्सिल आणि ग्रीन पार्टीच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

आपल्या विजयानंतर भावना व्यक्त करताना नीला यांनी सांगितले की, स्वीडनच्या संसदेचा भाग बनताना अत्यंत आनंद होत असून स्टॉकहोम शहर आणि देशाच्या विकासासाठी योगदान देण्यास त्या उत्सुक आहेत. ज्या नागरिकांना मतदानाचा अधिकार नाही अशा सर्वांचा आवाज बनून मुलांचे कल्याण, पर्यावरण संरक्षण आणि निसर्गाचे संतुलन राखण्यावर त्या विशेष भर देणार आहेत. आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी सांगितले की, त्या अवघ्या १५ वर्षांच्या असताना आजोबांनी त्यांना राज्याचा अर्थसंकल्प वाचायला लावला होता आणि आजोबांना अभिमान वाटेल असेच कार्य त्या पुढेही करत राहतील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या