अहमदनगर

अमरापूरमध्ये रोटरी कम्युनिटी कॉर्प्स यांच्याकडून ऑनलाईन कवी संमेलन


अमरापूर प्रतिनिधी 

रोटरी कम्युनिटी कॉर्प्स,अमरापूर आयोजित निमंत्रितांचे ऑनलाईन कवी संमेलन दि ०४ जुलै रोजी सायं ५ .३० ते ७ या वेळेत ऑनलाईन  घेण्यात आले.यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून अभिनेते आणि कवी उमेश घेवरीकर उपस्थित होते.तसेच  निमंत्रित कवी म्हणून तुषार निंभोरेकर,अस्मिता मराठे, द.भा.सडेकर,संतोष दौंडे,स्नेहल पोळ,प्रदीप बोरुडे,मनोज तेलोरे, राजेंद्र काळे यांनी आपल्या कविता सादर केल्या.

तुषार पाटील यांनी कोरोनाकाळातील मजुरांच्या व्यथा सांगताना आपल्या कवितेत म्हणाले,

स्वतःच्या घरट्याच्या दिशेने पायी जाताना

अर्ध्या रस्त्यातच जीव सोडलेल्या मजुराचा शासकीय रुग्णालयातून रिपोर्ट येतो,

करोना:निगेटिव्ह

भूक:पॉझिटिव्ह


सध्याच्या परिस्थितीत दुबार पेरणीचे संकट सांगताना कवी संतोष दौंडे म्हणाले,

ओठात ओरड

घशात कोरड

पावसाने असे हसे केले

आयुष्याचे उन्हाळे झाले


कवयित्री अस्मिता मराठे यांनी येणाऱ्या पावसाचे वर्णन केले की,

लपे गगनात सूर्य

येतो आभाळ फाडून

बरसात चैतन्याची

सरी ढगांच्या आडून


कवी प्रदीप बोरुडे यांनी हुंकार कवितेतून कोरोना काळातील आपली वेदना मांडली आहे

गर्तेत सापडले विश्व

अन चोहीकडे अंधार

कली तो मारण्या

ईश्वरा तूच घ्यावा अवतार


कवी द.भा.सडेकरांनी आई नावाची कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.त्यात ते म्हणतात

कसला रे तू पुरुष

तुला आई समजली नाही


अशी कविता सादर करून रसिकांची मने जिंकली


कवयित्री स्नेहल पोळ यांनी आपल्या सृजन कवितेतून सृजनशीलतेवर प्रकाश टाकला.

सृजनाची वाट जीवघेणी

परी वाटे सुखदायी पर्वणी


अगतिक आयुष्याची सल व्यक्त करताना कवी मनोज तेलोरे म्हणाले

काय शोधतोय हेही समजत नाही

अन काय चाललं हेही उमजत नाही


राजेंद्र काळे यांनी कोरोनामुळे ठरलेल्या लग्नात आलेल्या अडचणी सांगितल्या आहेत

हळद लावायची घाई बघा आली,बस्ता ठेवला बांधून

पत्रिका वाटल्या तरीबी गेला मुहुर्त लग्नाचा लुटून

कोरोना आलाय कसला कुठून गेला लॉकडाऊन करून


संमेलनाध्यक्ष घेवरीकर यांनी आपल्या एका कवितेत शाळा सुरू व्हाव्या ही विद्यार्थ्यांच्या मनातील भावना सांगताना म्हटले,

कीर्तन प्रवचनी

अभंगाला ताल यावा

धडे, कविता अन पाढे

अक्षरांचा अभंग व्हावा

कार्यक्रमासाठी शेवगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी ,सचिव प्रा.किसनराव माने ,माजी अध्यक्ष डॉ.संजय लड्डा,दिलीप फलके,इनरव्हीलच्या अध्यक्षा डॉ.मनीषा लड्डा,प्रा.चंद्रकांत पानसरे, योगेश खैरे,निलेश मोरे,एस व्ही मरकड आदी.उपस्थित होते.याशिवाय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील काव्य रसिक कार्यक्रमाला उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश लाडणे यांनी तर आभार बाळासाहेब चौधरी यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या