अहमदनगर

जामखेडमध्ये गँगवारचा थरार! कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर अज्ञातांकडून बेछूट गोळीबार


जामखेड

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात मंगळवारी रात्री गुन्हेगारी विश्वातील वैमनस्यातून भीषण गोळीबार झाला. कुख्यात गुंड आणि पैलवान सागर मोहोळकर याच्यावर नुराणी कॉलनी परिसरात दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले असून त्यातील पाच गोळ्या मोहोळकरला लागल्या आहेत. गंभीर जखमी झालेल्या मोहोळकरला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

सागर मोहोळकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी अत्यंत वादग्रस्त राहिली आहे. गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यातील आंदरुड येथील यात्रेत त्याने पुण्याचा कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या कानशिलात लगावली होती, ज्याची मोठी चर्चा झाली होती. मोहोळकरवर यापूर्वी खुनाचे दोन गुन्हे दाखल असून तुरुंगात असतानाही त्याने एकाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून किंवा टोळीयुद्धातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी अहिल्यानगरसह पुणे, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली असून पोलिसांची विशेष पथके रवाना झाली आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या