लातूर
महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. लातूर-तुळजापूर महामार्गावर औसा जवळ तीन वाहनांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एका वेगवान बीएमडब्ल्यू (BMW) कारने ट्रक आणि कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील ही बीएमडब्ल्यू कार काही कामानिमित्त लातूरला आली होती. काम आटोपून शिवली येथे जेवण करून हे सर्वजण औसाच्या दिशेने निघाले होते. वाटेत एका हॉटेलसमोर या कारने लाकडाने भरलेल्या ट्रकला मागून एवढी भीषण धडक दिली की, तो ट्रक १०० फूट लांब जाऊन उलटला. या धडकेनंतर बीएमडब्ल्यू कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून ती रस्त्याशेजारील खड्ड्यात जाऊन कोसळली.
अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. महाराष्ट्रात गेल्या काही काळात लक्झरी कारच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील पोर्श अपघात आणि मुंबईतील लॅम्बोर्गिनी अपघाताच्या पार्श्वभूमीवर या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

0 टिप्पण्या