शेंदूरवादा प्रतिनिधी । नानासाहेब जंजाळे
मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या 17 सप्टेंबर रोजी तब्बल 73 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, सरदार वल्लभ भाई पटेल सह अनेक स्वतंत्र सेनानी च्या अथक परिश्रमातून तर काहींच्या बलिदानातून मराठवाडा हा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद पोलीस ऍक्शन झाली व हैद्राबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत बलिदानवीरांच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैद्राबादचा निजाम स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न बघत होता. या संग्रामाच्या उज्ज्वल आणि लोकविलक्षण पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ततेनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल आणि लोकविलक्षण असे पर्व होते. हैद्राबादच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना स्वातंत्र्यलढ्याच्या कोणत्याही पर्वाशी केली जाऊ शकते, इतका तो गौरवास्पद आहे. असे असूनही या लढ्याकडे उर्वरित जनतेचे फारसे लक्ष जाऊ शकले नाही. कारण हा लढा चालू असताना उर्वरित देशाने नव्याने जन्म घातलेल्या स्वातंत्र्याच्या प्रसूती वेदनात पार बुडून गेला होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी जरी देश स्वतंत्र झाला तरी हैद्राबाद संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म 17 सप्टेंबर 1948 रोजी झाला. स्वातंत्र्याच्या जवळपास 11 महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते.15 ऑगस्ट 1947 रोजी जरी हिंदुस्थान व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तरी त्या दिवशी कुठेच सामील न झालेले एकमेव संस्थान हे हैद्राबाद होते. जैसेथे करार असतानाही निजामाने केलेल्या कृत्यामुळे हिंदुस्थान सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसवताच घाबरलेला निजाम शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरण आला. निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे मनसुबे भंग पावले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली. मात्र आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली.
0 टिप्पण्या