नगर
आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या श्री शनी शिंगणापूर देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सूर्यभान शेटे (वय ४३) यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये आर्थिक गैरव्यवहार, भाविकांची बनावट ॲपद्वारे फसवणूक अशा अनेक घटना समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणाही केली होती. तसेच, देवस्थानच्या नावाने तयार केलेल्या बनावट ॲपमुळे भाविकांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
नितीन शेटे यांच्या आत्महत्येचा या सर्व प्रकरणांशी काही संबंध आहे का, की यामागे काही वैयक्तिक किंवा प्रशासकीय कारणे आहेत, याचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत. शेटे यांनी अचानक उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे स्थानिकांना धक्का बसला असून, देवस्थानवर पुन्हा एकदा संशयाचे ढग दाटले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या तपासातून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 टिप्पण्या