मुंबई
मुंबईतील मलाड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ट्युशन शिक्षिकेने केवळ खराब हस्ताक्षरामुळे तिसरीत शिकणाऱ्या ८ वर्षांच्या चिमुकल्यावर अमानवी वागणूक करत त्याच्या हातावर पेटती मेणबत्ती ठेवली. यामुळे मुलाच्या हाताला गंभीर इजा झाली असून, या प्रकरणी कुरार पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा गोरेगावमधील शाळेत तिसरीत शिकतो आणि दररोज संध्याकाळी मलाडमधील जे. पी. डेक्स इमारतीत राहणाऱ्या राजश्री राठोड यांच्या घरी ट्युशनला जात होता. घटनेच्या दिवशी त्याची बहीण त्याला ट्युशनला घेऊन गेली होती. रात्री शिक्षिकेनेच फोन करून बहिणीला मुलाला घेऊन जाण्यास सांगितले. जेव्हा ती ट्युशनला पोहोचली, तेव्हा तिने पाहिलं की मुलगा रडत होता आणि त्याच्या उजव्या हातावर जळाल्याचे गंभीर निशाण होते.
शिक्षिकेला विचारल्यावर त्यांनी याला 'नाटक' म्हटले. मात्र घरी गेल्यावर मुलाने वडिलांना सांगितले की खराब हस्ताक्षरामुळे शिक्षिकेने त्याचा हात थेट पेटत्या मेणबत्तीवर ठेवला होता. हे ऐकून धक्का बसलेल्या वडिलांनी मुलाला तात्काळ कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केलं आणि कुरार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांअंतर्गत आरोपी शिक्षिका राजश्री राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शिक्षिका यापूर्वीही इतर विद्यार्थ्यांवर कठोर आणि अमानवी शिक्षेसाठी ओळखली जात होती.
0 टिप्पण्या