बोधेगाव प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील अधोडी येथील खंडागळे कुटुंबाच्या १० एकर ३२ गुंठे शेतजमिनीसंदर्भात मोठा गैरव्यवहार उघड झाला असून, मंडळाधिकारी व कामगार तलाठी यांच्या संगनमताने बनावट दस्तावेज तयार करून बेकायदेशीर वारस नोंद करण्यात आल्याचा आरोप शाहूराव खंडागळे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
काय आहे प्रकरण?
अधोडी येथील गट क्रमांक ७८ मधील खंडागळे कुटुंबाची शेतजमीन ही दिवंगत राजाराम बजबा खंडागळे यांच्या नावावर सामाईक आहे. राजाराम यांचे मृत्यू दिनांक २६ जुलै २००६ असताना, बनावट दस्तावेजांमध्ये त्यांचा मृत्यू १२ ऑगस्ट १९८८ रोजी दाखवण्यात आला आहे.
बनावट कागदपत्रांचा वापर
शाहूराव खंडागळे यांच्या मते, राजाराम यांच्या कुटुंबात दोन मुले, दोन मुली आणि पुतणे असताना इतर अनधिकृत व्यक्तींच्या नावाने बनावट वारस दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सुभद्रा भाऊराव खंडागळे या कुटुंबातील सदस्य जिवंत असतानाही, त्यांना मृत दाखवून 'सुभद्रा राजाराम खंडागळे' अशा बनावट नावाचा मृत्यूचा दाखला तयार करण्यात आला.
सरकारी कर्मचाऱ्यांची भूमिकेवर संशय
शाहूराव खंडागळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, "मी कामानिमित्त बाहेर असताना, मंडळाधिकारी व कामगार तलाठ्यांनी संगनमत करून बनावट मृत्यू दाखले तयार केले व नोंदणी प्रक्रियेत चुकीचे वारस दाखवून शेतजमिन बेकायदेशीरपणे हस्तगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला."
शाहूराव खंडागळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत:
- बनावट कागदपत्रांवर आधारित वारस नोंदी तत्काळ रद्द कराव्यात.
- अस्सल व कायदेशीर वारसांची नोंद तातडीने करण्यात यावी.
- मंडळाधिकारी व कामगार तलाठ्यांविरुद्ध सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
या प्रकरणामुळे गावात व तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, स्थानिक पातळीवर पारदर्शक चौकशीची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या