अहमदनगर

'ढेकळांचे पंचनामे करायचे का?' वादग्रस्त विधानावरून कृषीमंत्री कोकाटेंची सारवासारव


नाशिक 

राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा विवादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ‘ढेकळांचे पंचनामे करायचे का?’ या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर राज्यभरातून जोरदार टीका झाली आहे. अखेर कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण देत आपली भाषा चुकीची होती, पण हेतू नव्हता, असं सांगत सारवासारव केली आहे.

विवादास कारणीभूत ठरलेलं विधान काय होतं?

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नाशिकमधील पाहणी करत असताना कोकाटे म्हणाले होते: "कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?" त्यासोबतच त्यांनी "घरात आणून ठेवलेल्या मालाचे पंचनामे करता येणार नाहीत. शेतात नुकसान झालेले कांदा व अन्य जी पिके असतील, त्यांचे रितसर पंचनामे केले जातील," असे स्पष्ट केले होते.

राज्यभरातून टीकेचा भडीमार

या विधानामुळे अनेक शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी कृषीमंत्र्यांवर संवेदनाहीनतेचा आरोप करत राजीनाम्याची मागणी केली. सोशल मीडियावरही कोकाटेंच्या वक्तव्याची तीव्र चर्चा झाली.

कोकाटेंचं स्पष्टीकरण

या वादानंतर माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, "सध्या अनेक शेतांमध्ये पिके नाहीत. अशा परिस्थितीत पंचनामे करून उपयोग काय? मात्र ज्या ठिकाणी खरंच नुकसान झालं आहे, तिथे पंचनामे करण्याचे आदेश मी दिले आहेत." ते पुढे म्हणाले, "माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतला जातोय. माझा हेतू शेतकऱ्यांचा अपमान करणे नव्हता. अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना निश्चितच नुकसान भरपाई दिली जाईल."

याआधीही वादग्रस्त विधान

माणिकराव कोकाटे यांचं हे पहिलं वादग्रस्त विधान नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी वक्तव्य करत संतप्त प्रतिक्रिया ओढवून घेतली होती. त्या विधानासाठीही त्यांना माफी मागावी लागली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या