मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १,११,१११ रुपयांचा धनादेश प्रतापराव व ऋषिकेश ढाकणे यांच्याकडून फडणवीस यांच्या स्वाधीन
बोधेगाव प्रतिनिधी
राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, पिकांची नासधूस, जनावरांचे मृत्यू, घरांचे नुकसान अशा अनेक अडचणींना शेतकरी सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन राज्य शासनाने करण्यात आले होते. या हाकेला प्रतिसाद देत कै. सुमनताई ढाकणे प्रतिष्ठान, पाथर्डी यांनी पुढाकार घेत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
या प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹१,११,१११ रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधीन करण्यात आला. हा धनादेश प्रतापराव ढाकणे आणि संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी मुंबई येथे सन्मानपूर्वक सुपूर्त केला.
यावेळी प्रतापराव ढाकणे म्हणाले की, “अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकरी अतिशय कठीण परिस्थितीत आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी आपापल्या परीने योगदान देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे. कै. सुमनताई ढाकणे प्रतिष्ठान नेहमीच समाजकार्याच्या आघाडीवर राहिले असून, भविष्यातही विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात सक्रिय राहणार आहे.”
प्रतापराव ढाकणे यांनी सांगितले की, “आईच्या नावाने स्थापन झालेल्या या प्रतिष्ठानचे ध्येय नेहमीच समाजसेवा राहिले आहे. शेतकरी वर्गाच्या अडचणी ओळखून, त्यांना थोडासा दिलासा देणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे.”
या मदतकार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, कै. सुमनताई ढाकणे प्रतिष्ठानने दाखवलेली सामाजिक संवेदनशीलता आणि जबाबदारी प्रेरणादायी ठरत आहे.
0 टिप्पण्या