अहमदनगर

पुण्यात प्रियकराकडून गर्लफ्रेंडची चाकूने भोसकून हत्या; अनैतिक संबंधांच्या संशयातून संपवले


पुणे

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका प्रियकराने अनैतिक संबंधाच्या संशयावरून आपल्या गर्लफ्रेंडची चाकूने वार करून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर प्रियकर पळून गेला नाही, तर त्याने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर दिलावर सिंह (रा. पिसौली, पुणे) याला त्याची गर्लफ्रेंड मेरी मल्लेश तेलगू (वय २६, रा. शीतला नगर, देहुरोड) हिचे दुसऱ्या कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने तिला संपवण्याचा कट रचला. आज दुपारी तो मेरीला वाकड परिसरातील एका लॉजमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने मेरीचा मोबाईल तपासला, ज्यामुळे त्याचा संशय खरा ठरला. या रागातून दिलावरने चाकूने तिच्यावर सपासप वार केले आणि तिला ठार मारले.

या खुनाच्या घटनेनंतर दिलावरने आपल्या गाडीने थेट पुणे येथील कोंढवा पोलीस स्टेशन गाठले आणि तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांसमोर आपण मेरीची हत्या केल्याचे कबूल केले. कोंढवा पोलिसांनी त्वरित वाकड पोलिसांना घटनेची माहिती दिली. वाकड पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मेरीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.

मेरीच्या कुटुंबीयांनी दिलावरविरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिलावरला अटक केली आहे. हत्या करताना दिलावरसोबत आणखी कोणी होते का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती वाकड विभागाचे पोलीस उपायुक्त डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या