अहमदनगर

'ORS' नावाच्या वापरावर बंदी! एफएसएसएआय (FSSAI) चा मोठा निर्णय

एका बालरोगतज्ञाच्या लढ्याला अखेर यश


नवी दिल्ली

उत्पादनांवर 'ओआरएस' (ORS) नावाचा वापर करण्यास मनाई: एफएसएसएआयचे निर्देश बुधवारी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना तसेच सर्व केंद्रीय परवाना प्राधिकरणांना निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, अन्न व्यवसाय संचालकांनी (FBO) यापुढे आपल्या खाद्य उत्पादनांमध्ये 'ओरल रिहायड्रेशन सोल्युशन' (Oral Rehydration Solution) अर्थात 'ओआरएस' या नावाचा वापर करू नये. हैदराबाद येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवरंजनी संतोष यांनी यासाठी अनेक वर्षे लढा दिला होता. त्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेण्यासोबतच पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पत्रेही लिहिली होती.

चेन्नईमध्ये मधुमेहाने त्रस्त असलेल्या एका मुलाला निर्जलीकरणामुळे (डिहायड्रेशन) अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावे लागले होते. त्याला उलट्यांचा त्रास होत असताना 'टेट्रा पॅक'मधून 'ओआरएस' देण्यात आले होते, परंतु रुग्णालयात दाखल झाल्यावर त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाली. दुसऱ्या एका घटनेत, भाजलेल्या जखमांवर उपचार घेत असलेल्या एका तरुणीची प्रकृती निर्जलीकरणामुळे गंभीर बनली. तिलाही 'ओआरएस' देण्यात आले होते. या दोन्ही घटनांमध्ये सीलबंद, विविध चवींचे 'ओआरएस' हे पेय समान होते.

गेल्या अनेक वर्षांपासून चिंताग्रस्त नातेवाईक आणि पालकांकडून समाजमाध्यमांवर येत असलेल्या या घटनांचा बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवरंजिनी संतोष अभ्यास करत होत्या. डॉ. दिलीप महालानबीस यांनी शोधलेल्या खऱ्या 'ओआरएस'ऐवजी गोड, चवदार पेयांचे अतिसार झालेल्या मुलांना सेवन करावे लागू नये, हे डॉ. शिवरंजिनी यांचे उद्दिष्ट होते. बुधवारी अन्न नियामकांनी सर्व पेय उत्पादकांना त्यांच्या व्यापार चिन्हावर 'ओआरएस' हा शब्द वापरण्यास बंदी घालणारा आदेश जारी केल्यावर डॉ. शिवरंजिनी यांच्या या लढ्याला यश मिळाले.

'वेळेत उपचार न मिळाल्यास मृत्यूचा धोका' डॉ. शिवरंजिनी संतोष यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'ला सांगितले की, "ओआरएस हे एक वैद्यकीय उत्पादन आहे, ज्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचले आहेत. पाच वर्षांखालील मुलांमध्ये होणाऱ्या सुमारे १३ टक्के मृत्यू अतिसारामुळे होतात आणि अशा मृत्यूंना रोखण्यासाठी ओआरएस हे एक प्रभावी साधन आहे." त्यांनी पुढे सांगितले की, "ओआरएसमध्ये ग्लुकोज, सोडियम क्लोराईड आणि पोटॅशियम क्लोराईड किती असावे, यासाठी एक निश्चित सूत्र आहे. बाजारात 'ओआरएस'च्या नावाने उपलब्ध असलेली उत्पादने मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यास मृत्यू देखील होऊ शकतो."


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या