नवी दिल्ली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांमुळे भारत-अमेरिका संबंधात वारंवार निर्माण होत असलेला तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसत आहे. नुकताच ट्रम्प यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची चर्चा झाली असून, भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. यावर गुरुवारी (१७ ऑक्टोबर २०२५) भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, 'माझ्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात अशी कोणतीही चर्चा झालेली नाही.' मंत्रालयाने सांगितले की, 'भारतासाठी तेल खरेदीचा निर्णय हा सामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन घेतला जातो.' तसेच, भारत अमेरिकेकडूनही ऊर्जा खरेदी वाढवण्यास इच्छुक आहे.
ट्रम्प यांच्या विसंगत विधानांमुळे संभ्रम
ट्रम्प यांनी दोन वेगवेगळ्या वेळेस चर्चेच्या तारखा सांगितल्या. एकदा 'दोन दिवसांपूर्वी' चर्चा झाली, असे म्हटले, तर दुसऱ्या वेळेस 'मोदींनी मला आज आश्वासन दिले' असे म्हटले. मलेशियामध्ये मोदींना भेटणार का, या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले होते की, 'होय, नक्कीच. ते माझे खूप चांगले मित्र आहेत, पण मी त्यांच्यावर नाराज आहे कारण भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे.' त्यानंतर त्यांनी भारताने खरेदी थांबवल्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. मात्र, भारत आणि अमेरिकेच्या अधिकृत माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये शेवटची चर्चा ९ ऑक्टोबर रोजी झाली होती.
भारताचे धोरण स्पष्ट
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, 'भारत तेल आणि वायूचा एक महत्त्वाचा आयातदार आहे. अस्थिर ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांचे हित जपण्यास आमचे प्राधान्य आहे.' ऊर्जा धोरणाची दोन उद्दिष्ट्ये आहेत - स्थिर ऊर्जा दर आणि सुरक्षित पुरवठा सुनिश्चित करणे. यात विविध स्रोतांकडून खरेदी करणे आणि ऊर्जा स्रोतांचा विस्तार करणे समाविष्ट आहे.
रशियन राजदूत म्हणाले, भारताला फायदा
दरम्यान, ट्रम्प यांच्या दाव्यानंतर काही तासांतच भारतात रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव यांनी सांगितले की, 'मोदी आणि ट्रम्प यांच्या चर्चेबद्दल मला माहिती नाही. पण, भारत सरकार आपल्या जनतेच्या हितानुसार निर्णय घेते. म्हणूनच रशियाकडून तेल खरेदी केली जात आहे आणि यामुळे भारताला खूप फायदा होतो.' ते म्हणाले की, पहिल्यांदाच रशिया भारताच्या शीर्ष चार व्यापारी भागीदार देशांमध्ये सामील झाला आहे.
0 टिप्पण्या