मुंबई
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुले, रुग्णवाहिका आणि सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी सायंकाळी पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या मोठ्या वाहतूक कोंडीमुळे ५०० हून अधिक विद्यार्थी आणि प्रवासी सुमारे १२ तास अडकून पडले होते.
विविध शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वीचे विद्यार्थी तसेच शेजारच्या ठाणे आणि मुंबईतील काही कॉलेज विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या १२ बसेस मंगळवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास वसईजवळ अनेक किलोमीटर लांब असलेल्या जाममध्ये अडकल्या. विरारजवळील शालेय सहलीवरून परतत असलेल्या या मुलांना अनेक तास अन्न आणि पाण्याशिवाय राहावे लागले.
मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य धावले
मंगळवारी सायंकाळी लागलेल्या भीषण जाममुळे अनेक तास वाहने जेमतेम पुढे सरकत होती. रात्रीपर्यंत अनेक विद्यार्थी थकले होते, भुकेले होते आणि चिंतेत होते. तर दुसरीकडे पालक आपल्या मुलांच्या सुरक्षिततेच्या माहितीसाठी आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस एका स्थानिक सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अडकलेल्या मुलांना पाणी आणि बिस्किटे वाटली, तसेच चालकांना गर्दीच्या रस्त्यांतून बसेस बाहेर काढण्यास मदत केली.
भूकेमुळे आणि थकव्यामुळे रडत होते विद्यार्थी
एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले की, "विद्यार्थी भूक आणि थकव्यामुळे रडत होते. खराब वाहतूक व्यवस्थापनामुळे त्यांना इतका त्रास होताना पाहणे हृदयद्रावक होते." ठाण्यातील घोड़बंदर महामार्गावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे अवजड वाहनांचे मार्ग बदलण्यात आले होते. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण वाढला आणि जाम लागला, असे कार्यकर्त्याने सांगितले.
पालकांकडून प्रशासनावर संताप
विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या काही बसेसने मार्ग बदलून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तर काही बसेस जाममध्ये हळूहळू पुढे सरकल्या. अडकलेली शेवटची बस बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली, अशी माहिती सूत्रांनी दिली. जाममध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी या परिस्थितीसाठी खराब नियोजन आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाच्या अभावाला जबाबदार धरले आहे. एका पालकाने संताप व्यक्त करत, "आमची मुले अनेक तास असहाय्य होती. तिथे ना पोलीस होते, ना कोणती माहिती, ना कोणती व्यवस्था," असे म्हटले.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वाहतूक विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांनी तातडीने सुधारणात्मक उपाययोजना कराव्यात, विशेषत: रस्त्यांवरील दुरुस्तीचे काम आणि मार्ग बदलण्याची योजना आखताना विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
0 टिप्पण्या