अहमदनगर

पालघर भाजपमध्ये तुफान हाणामारी! माजी शहराध्यक्ष आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष


पालघर

पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, भाजपच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक आंबुरे आणि भाजप कार्यकर्त्या वैशाली चव्हाण यांच्यातील वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाले. या प्रकरणी आंबुरे यांच्यावर विनयभंग केल्याचा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

नेमका काय आहे प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर शहरातील लोकमान्य नगर भागात भाजपच्या दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यामुळे पक्षातील गटबाजी उघड झाली आहे. अशोक आंबुरे आणि वैशाली चव्हाण यांच्यात पैशाच्या मागणीवरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

वैशाली चव्हाण यांचा आरोप आहे की, अशोक आंबुरे यांनी नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली होती आणि ती मागणी नाकारल्यामुळे त्यांचे तिकीट कापले गेले. तसेच, सध्या झालेल्या वादात आंबुरे यांनी आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांनुसार, अशोक आंबुरे यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांवर विनयभंगासह विविध कलमांखाली पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यस्थीचे प्रयत्न निष्फळ

खासदार डॉ. हेमंत सवरा आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. दोन्ही गटांनी परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. नगरपरिषद निवडणूक जवळ असताना झालेल्या या हाणामारीमुळे भाजपच्या मतदानावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अशोक आंबुरे यांच्या पत्नी रोहिणी आंबुरे या वॉर्ड क्रमांक १४ मधून नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या