अहमदनगर

माया मुंडेंच्या रूपाने शिवसेनेचा भगवा शेवगाव नगरपरिषदेत फडकणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


बोधेगाव प्रतिनिधी 

शेवगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना, तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. माया अरुण मुंडे यांना खंबीर साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवगाव येथील जाहीर सभेत बोलताना केले.

शेवगाव येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेत जनशक्तीचे नेते ॲड. शिवाजीराव काकडे, माजी जि.प. सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी विविध सरपंच, सेवा संस्थांचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला.

“जनशक्ती आणि शिवशक्ती एकत्र… आता शेवगावमध्ये भगवा” – शिंदे

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काकडे कुटुंबाने विना अट विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आज जनशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्या असून, त्यामुळे आगामी निवडणुकीत शेवगाव नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा नक्की फडकेल. “परिवर्तन घडवा आणि शहराच्या विकासासाठी शिवसेनेला खंबीर साथ द्या,” असे आवाहन त्यांनी केले. 

शहर विकासासाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा

शिंदे यांनी जाहीर सभेत पुढील महत्त्वाचे विकास प्रकल्प प्राधान्याने राबविण्याची ग्वाही दिली—

  • शेवगाव शहरासाठी रिंगरोड
  • शॉपिंग सेंटर व नवीन नगरपरिषद इमारत
  • शहरातील रस्ते, आरोग्य व सुशोभीकरणासाठी विशेष निधी
  • औद्योगिक वाढीसाठी एमआयडीसी उभारणी
  • पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तत्काळ उपाययोजना


त्यांनी सभेतूनच उद्योग मंत्री उदय सावंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून तात्काळ निधी आणि प्रकल्पांसाठी आश्वासनही मिळवले. “आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ कायम – शिंदे

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना कायम राहणार असून ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मोठा निधी देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा संकल्पही त्यांनी मांडला.

शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या मदतीची आठवण करून देत, “शेवगावात घराणेशाहीला योग्य धडा शिकवून नवे परिवर्तन घडवा,” असे आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केले.

हर्षदा काकडे : “शेवगावच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेत प्रवेश”

सभेत बोलताना सौ. हर्षदाताई काकडे म्हणाल्या की, शेवगावच्या मूलभूत समस्या वीज, पाणी, रस्ते, आरोग्य यांचे निराकरण करून विकासाला गती मिळावी यासाठी शिवसेनेत प्रवेश केला. भविष्यात विविध विकास योजना राबविण्याची मागणीही त्यांनी केली. आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमास आ. विठ्ठलराव लंघे, आ. विलास भुमरे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे, अरूण मुंडे,ज्येष्ठ नेते एकनाथ कुसाळकर, बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, पप्पू केदार, साईनाथ आधाट यांच्यासह  पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाऊसाहेब सातपुते, दत्ता शिंदे, दिलीप भागवत, विनोद साळवे, लक्ष्मण गवळी, पोपट पाखरे, जिल्हाध्यक्ष बाबूशेट टायरवाले, नगरचे माजी महापौर संभाजी कदम, ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावडे, हाजी सालारभाई शेख, अमोल घोलप, प्रकाश तुजारे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सूत्रसंचालन  दीपक कुसाळकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या