नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी 'ऑपरेशन सायबरहॉक' अंतर्गत एक मोठी कारवाई करत करोल बागच्या मोबाईल हबमध्ये सुरू असलेल्या बनावट मोबाईल फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १८२६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. हे टोळके चायनीज सॉफ्टवेअर आणि आयएमईआय (IMEI) नंबर बदलून जुन्या मोबाईल फोन्सला नवीन फोन असल्यासारखे बाजारात विकत होते. जप्त केलेले मोबाईल फोन हे नॉन-ट्रेसेबल चायनीज आयएमईआय नंबर असलेले होते, म्हणजे ज्यांना ट्रॅक करणे अत्यंत कठीण आहे, त्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे.
या टोळीत एका चायनीज व्यक्तीचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्यानंतर, चीनशी जोडणी आणि दहशतवादी संबंधांच्या (टेरर अँगल) दिशेने तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे. सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या करोल बाग पोलीस स्टेशनच्या टीमने ही बनावट मोबाईल बनवण्याची युनिट उघडकीस आणली. पोलिसांनी त्यांच्याकडून १८२६ तयार आणि अर्ध-तयार मोबाईल फोन, लॅपटॉप, चायनीज सॉफ्टवेअर, आयएमईआय स्कॅनर, मोबाईल बॉडी पार्ट्स आणि छापलेले आयएमईआय लेबल जप्त केले आहेत. करोल बाग येथील बीडनपुराच्या गल्ली क्रमांक २२ मधील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मोबाईल फोन असेंबलिंग आणि आयएमईआय नंबरमध्ये फेरफार करण्याचा हा अवैध धंदा सुरू होता.
'गँग लीडर अशोकचे चीनला वारंवार येणे-जाणे होते'
२० नोव्हेंबर रोजी पोलीस पथकाने 'आदित्य इलेक्ट्रॉनिक्स अँड ॲक्सेसरीज' नावाच्या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी ५ लोक जुने मोबाईल मदरबोर्ड घेऊन ते नवीन बॉडी पार्ट्समध्ये बसवताना आढळले. अटक केलेले हे पाचही आरोपी दिल्लीचे रहिवासी आहेत. त्यांचा म्होरक्या अशोक आहे, जो त्याच्या एका चायनीज मित्राच्या मदतीने करोल बागमध्ये ही अवैध मोबाईल फॅक्टरी चालवत होता. सेंट्रल दिल्लीचे डीसीपी निधिन वलसन यांनी सांगितले, 'पोलिसांच्या तपासात या संपूर्ण टोळीचे धागेदोरे चीनशी जोडले जात आहेत. गँग लीडर अशोकचे चीनला वारंवार येणे-जाणे होते. पोलीस सूत्रांनुसार, काही चायनीज लोकही येथे येत-जात असत. पोलीस आता या टोळीच्या चायनीज संबंधांचा तपास करत आहेत.'
पोलिसांनी केलेल्या चौकशीत अटक केलेल्या आरोपींनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. हे लोक स्क्रॅप डीलर्सकडून जुने मोबाईल आणि मदरबोर्ड विकत घेत असत. स्क्रॅप मार्केटमधून जुने, चोरीचे मोबाईल स्वस्त दरात खरेदी करत. नवीन मोबाईलचे पार्ट्स चीनमधून मागवले जात. त्यानंतर येथे मोबाईलची असेंबलिंग केली जात असे आणि चायनीज सॉफ्टवेअरच्या मदतीने जुना आयएमईआय नंबर बदलून बनावट आयएमईआय नंबर टाकला जात असे. चायनीज सॉफ्टवेअर वापरून मोबाईलचा खरा आयएमईआय नंबर बदलला जाई आणि नंतर फोनची पॅकिंग करून बाजारात विकला जाई. हे फोन करोल बागच्या गफ्फार मार्केटव्यतिरिक्त दिल्ली-एनसीआरमधील इतर मोबाईल मार्केटमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून विकले जात होते.
पार्ट्स पुरवठादाराद्वारे हजारो मोबाईल बॉडी चीनमधून शिपमेंटच्या स्वरूपात येत होत्या. गेल्या दोन वर्षांपासून ही टोळी चोरी, लूटमार, सायबर फसवणूक आणि इतर गुन्ह्यांमध्ये वापरले जाणारे मोबाईल फोन तयार करत होती. आयएमईआय बदलल्यामुळे या फोन्सना ट्रॅक करणे कठीण होते, त्यामुळे गुन्हेगारांसाठी हे फोन पहिली पसंती बनले होते. दिल्ली पोलीस आता या आरोपींकडून हे मोबाईल फोन कोणाकोणाला विकले जात होते, याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मोबाईल फोन केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच विकले जात होते की देशातील इतर राज्यांमध्येही त्यांचे नेटवर्क सक्रिय आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच आणखी अटक होण्याची शक्यता आहे.

0 टिप्पण्या