अहमदनगर

कृषी विज्ञान केंद्र दहिगाव- ने येथे रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण वर्ग संपन्न


शेवगाव

श्री मारुतराव घुले पा. शिक्षण संस्थेचे व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली आयोजित कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव ने येथे ग्रामीण युवकांसाठी नुकताच रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावर पाच दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गात कार्यक्षेत्रातील 28 ग्रामीण युवक व युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत प्राप्त माहितीबद्दल समाधान व्यक्त केले.



केंद्राचे कामकाज संस्थेचे अध्यक्ष मा. आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षणार्थींना रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षणामध्ये रोपवाटिका स्थापनेची कार्यपद्धती, जागेची निवड आणि पूर्वतयारी, रोपवाटिकेतील मातृवृक्षांची लागवड आणि संगोपन, रोपवाटिकेतील विविध हत्यारे व औजारे, रोपवाटिकेकेतील अभिवृद्धीसाठी माध्यमे, साहित्य व अभिवृद्धीगृहे, रोपवाटिका व्यवसायातील संधि व महत्व, रोपवाटीकेतील झाडांची अभिवृद्धी (प्रात्यक्षिक- डोळा भरणे व कलम करणे), रोपवाटीकेतील मजूर व्यवस्थापन, पुष्पगुछासाठी आवश्यक मातृवृक्षांची लागवड आणि संगोपन, पुष्पगुछ बनवणे प्रात्यक्षिक, संरक्षित शेती, भाजीपाला रोपवाटिका, रोपवाटिका एक स्टार्टअप बिझनेस मॉडेल, भाजीपाला, फळ तसेच सुशोभित झाडांच्या रोपवाटीकेस भेट, शासनाच्या रोपवाटिका विकासाच्या योजना, रोपवाटीकेतील वाफे आणि अभिवृद्धीगृहांचे निर्जंतुकीकरण, यशस्वी उद्योजगाचे गुण या प्रमुख विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. एस.एस.कौशिक, श्री. माणिक लाखे, श्री. नारायण निबे, श्री. सचिन बडधे, इंजि. राहुल पाटील, श्री. प्रकाश बहिरट, श्री. प्रकाश हिंगे यांनी तसेच प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक श्री नंदकिशोर दहातोंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षणार्थींना रोपवाटिका व्यवस्थापन करणाऱ्या सुलतानपूर येथील उद्योजक श्री. श्रीकांत खाटिक यांच्या मोरया हायटेक नर्सरी, गेवराई येथील उद्योजक श्री. अभिषेक ताकवणे यांच्या ताकवणे पाटील हायटेक नर्सरी व जळके येथील उद्योजक श्री. विकास चावरे यांच्या गुरुदास अॅग्रो नर्सरी येथे भेटी देण्यात आल्या. प्रशिक्षण वर्गाचे समारोपावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. अशा प्रकारचे प्रशिक्षण वारंवार व्हावेत, प्रशिक्षणापासून आम्हाला नक्की फायदा होईल अशी भावना यावेळी काही प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केली.

ग्रामीण युवक व युवतींमध्ये उद्योजक वाढवण्यासाठी तसेच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रोपवाटिका व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. शेतक-यांना उत्तम दर्जाची कलमे रोपे पुरवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली रोपे पुरवठा करणे हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे असून यास मोठ्या प्रमाणात वाव आहे असे यावेळी श्री नंदकिशोर दहातोंडे,  प्रशिक्षण समन्वयक यांनी आवर्जून नमूद केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या