अहमदनगर

पश्चिम बंगालमध्ये AI ने तयार केलेले नग्न फोटो व्हायरल झाल्यामुळे १०वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या


कोलकाता

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सोनारपूर येथे १०वी इयत्तेतील एका विद्यार्थिनीने आपल्या खोलीत गळफास घेतल्याचे उघड झाले आहे. तिचे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) वापरून तयार केलेले नग्न फोटो सोशल मीडियावर पसरल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी शुक्रवारी या घटनेची माहिती दिली.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही मुलगी तिच्या मामाच्या घरी राहत होती. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला गुरुवारी रात्री मृत घोषित केले. "आम्हाला अशी तक्रार मिळाली आहे की परिसरातील एक विवाहित व्यक्ती तिला त्रास देत होता," असे त्यांनी सांगितले.

मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी तक्रारीत आरोप केला आहे की, त्या व्यक्तीने तिचे फोटो जमा केले आणि 'एआय' साधनांचा वापर करून तिचे नग्न चित्र तयार केले, जे नंतर ऑनलाइन शेअर करण्यात आले.

पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले, "कुटुंबीयांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यही या छळामध्ये सामील असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी यात सहभागी असलेल्या सर्व लोकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे."

प्राथमिक अहवालानुसार, हा छळ आणि ऑनलाइन गैरवर्तन यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनी दीर्घकाळापासून मानसिक त्रासात होती आणि यातूनच तिने आत्महत्या केली असावी, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या